Saturday, 28 October 2017

देऊळ पलिकडे तरीही...

त्याला जाऊन आज जवळ जवळ सव्वा वर्ष झालं... नाई, म्हणजे या  opening statement  ने असं वाटू शकतं की त्याचा मृत्यू अकाली झाला किंवा अपघात वगैरे... तर असं काही नाही... ९३ वर्षांचं प्रदीर्घ आणि ठणठणीत असं आयुष्य होतं त्याचं; शेवटल्या महिन्यातलं आजारपण आणि दवाखाना सोडता.
त्याचा जन्म आपला देश पारतंत्र्यात असताना झाला पण क्रांतिकारकांच्या यादीत त्याचं नाव नव्हतं...प्रत्येकाचं कसं असेल! मुद्दा असा की आजपासून किमान ३ पिढ्या मागे अशा काळात त्याचा जन्म झाला...गरीब किंवा  lower middle class  म्हणता येईल अशा घरात...  sorry  देवभोळ्या आणि कर्मठ घरात[ हा दोष नव्हे किंवा  pseudo secular  नसल्यामुळे मी हा दोष मानत नाही]... त्याचाच परिणाम असेल कदाचित ... त्यामुळे धर्म-अधर्म जात-पोटजात सोवळं-ओवळं स्पृश्य-अस्पृश्य भक्ष-अभक्ष पेय-अपेय अशी सगळी व्यवधानं त्याच्याभोवती आयुष्यभर फेर धरून राहिली आणि जोडीला "लोक काय म्हणतील?" चा पिंजराही होताच... मग का बरं लिहावसं वाटावं त्याच्याबद्दल... सामान्य माणसातलं  असामान्यत्व किंवा अपूर्णातलं पूर्णत्व मला भावलं त्याच्यात कायम दिसलं आणि तो गेल्यानंतरही ते अजून माझ्याभोवती कवचकुंडलासारखं अभेद्य उभं आहे म्हणून
तर हा गरीब मुलगा... पितृभक्त मुलगा खूप कष्टानं  pre-degree  पर्यंत शिकला म्हणजे  formal school  मधे तोवर गेला; मग घरची नड म्हणून असेल किंवा आणखी काही पण सरकारी नोकरी लागली... यथावकाश लग्न-संसार चालू झालं... सततच्या बदल्या,नोकरीतले त्रास तरीही सरकारी नोकरी म्हणजे शाश्वत खाली मान घालून पण एक आण्याचाही गैरव्यवहार न करता, करत राहिला... ४ मुलं, बेताचाच २७ रुपये पगार,मुलांची शिक्षणं हे सगळं जपताना नाकी नऊ  येत असतील तरी हा पुंडलिक आयुष्यभर आई-वडिलांच्या पायाशी राहिला... कमवणारे दोन हात; खाणारी आठ तोंडं अशा परिस्थितीतही तो ताठ मानेनं जगला... मुलांना म्हणजे  मुलींनाही पदवीधर होण्याइतकं यश मिळू दिलं हे सगळं झालं; सगळं  typical  मध्यमवर्गीय ... इथंवर करोडोंमधला तो ही अगदीच  non-glamorous  असा सामान्य माणूस पण इथे संपत नाहे... इथे संपते ती एका संसाराची ओळख...
यापुढे सुरू होतो तो... इथून पुढे उभा राहतो तो एक सच्चा रसिक,उमदा बाप,निस्वार्थी शिक्षक/गुरू, आणि आजन्म शिकत रहिलेला विद्यार्थी... इथून दिसू लागतो तो गंगौघ.
प्रत्येक आणा... अगदी अर्धा आणासुद्धा चार-चारदा विचार करून वापरणारा हा... म्हणजे आजच्याच काय पण त्याही काळात लोक "चिंधी" म्हणू शकतील इतका हिशोबी पण शास्त्रीय आणि नाट्यसंगीतवर त्याने मोजदाद करण्यापलिकडे प्रेम केलं.... बालगंधर्वांचं नाटक पुन्हा पुन्हा बघता नि ऐकता यावं म्हणून कित्येक वर्षे तपश्चर्या केली.पैसे वाचतात म्हणून ओंकारेश्वर ते पुणे स्टेशन असं अंतर पायी कापणारा पण नाटकाचे खेळ न चुकवणारा हा सच्चा रसिक...
मुलांची शिक्षणं होईपर्यंतच नाही तर त्यांच्या नोकरीच्या काळात,संसारात तो पहाडासारखा अचल होऊन त्यांच्या पाठीशी उभा राहिला...पहाटे एकट्याला जायला लागू नये म्हणून लेकाला रोज... कित्येक वर्षं तो शिवाजीनगर रेल्वेस्थानकाला सोडून आला. लेकींचा संसार सुखाचे  व्हावेत,त्यांची घरं उभी रहावीत य एका ध्येयापायी,  पेन्शनमधून पैसे वाचवून ओंजळ रिती करत राहिला. लेकीची एक फेरी वाचावी म्हणून नातवंडाना लेकीकडून घेऊन ६०+ वयात २-४ किमी चालून शाळेत सोड, नातवंडाना पाळणाघर नको म्हणून आपलं निवृत्त आयुष्य निवांत न घालवता त्यांचा पालक हो... असं जमेल ते सगळं केलं. अगदी मृत्यूच्या आदल्या महिन्यापर्यंत "हे तुझ्या खाऊचे पैसे" अशा भावनेनं लेकींना स्वकमाईतला काही भाग द्यायला नुसतं बाप असून चालत नाही, बाप व्हावं लागतं.
काही काळ गरज  म्हणून असेल पण आयुष्यभर नाही... शिक्षकीपेशा नसूनही आयुष्यभर कधी अगदी क्षुल्लक किंवा मोबदला  न घेता हा शिकवत राहिला. गणित इंग्रजी,संस्कृत,मेघदूत,गीता,वेदांमधल्या ऋचा ... ह्यानं काय शिकवलं नाही! इतके विविध विषय लीलया शिकवणारा माझ्या ओळखीतला हा एकमेव शिक्षक... बर मोबदला घेतला तर किती... अगदी  २००० सालीसुद्धा महिना ५०/- ... हो पन्नास रुपये ही त्याची इंग्रजी शिकवण्याची फी... बाकी संस्कृत,गीता, मेघदूत वगैरे तर फुकटच. त्याचे विद्यार्थी जगाच्या कित्येक देशात स्वत:चा झेंडा रोवून आलेत;पर्यायानं आपल्या गुरुचाही.
तो उत्तम शिक्षक होता कारण तो आजन्म विद्यार्थी होता. शेक्स्पिअर आणि कालिदास दोन्ही आत्मसात करणारा हा हिरा... गीतापंडीत ही पदवी असूनही पाय घट्ट जमिनिवर ठेवून अभ्यास करणारा आणि इतरांच्या ज्ञानाचा आदर ठेवणारा...अगदी नविन तंत्रज्ञान, फ़ेसबुक सारखी माध्यमं म्हणजे काय हे नातवंडांकडून माहित करून घेणारा....
रामायण,महाभारत,वेद, उपनिषदं , इथपासून हॅम्लेट,औथेल्लो ,मेघदूत असा लीलया विहार करणारा हा राजहंस... त्याच्या नातवंडांचे भौतिक लाड त्याने फार केले नसतील पण शरीर , मन अन बुद्धीला पोषण मिळावं म्हणून खूप यत्न केले.हॉटेल मधे नेलं नसेल पण पुरणपोळी भिजेपर्यंत तुप पानात पडलं नाही अशी अपवादाला सुद्धा खेप नाही.त्याच्या खिशातून भेळ खायला पैसे सुटले नसतील पण सुकमेवा कधी चुकला नाही. त्यानं कधी सिंड्रेला, जादूची कांडी, बेडकाचा झालेला राजपुत्र अशा कथा ऐकवल्या नाहीत; पण ५००० वर्षांची संस्कृती , महाभारत...उपनिषदं,वेद यातल्या गोष्टी वाड्यातल्या अंगणात बसून विनासायास रुजवली. सच्चेपणा,कष्ट, प्रयास, शिस्त हे स्वत:च्या वागण्यातून न बोलता शिकवलं.
सामान्य माणसाचे राग-लोभ, हेवे-दावे,कर्मठपणा हे सगळं त्याच्याठायी होतं... माणूस म्हणलं की दोष आलेच... ते नाकारता येणार नाहीतच तरीही.... त्याचं मोठेपण टिकलं त्याच्या  acceptance  मुळे.
"माझ्या लेकींइतकी क्षमाशीलता माझ्याकडे नाहीये" असं किती बाप मेल इगो बाजूला ठेऊन म्हणतात; "माझ्या लेकी शिकल्या ते माझ्यामुळे नाई, तुझ्या आजीमुळे" असं कुठला नवरा सहज स्वाकारतो... तारुण्यात घरातला चमचा सुद्धा इकडचा तिकडे केला नसेल तोच विनातक्रार "तिनं माझा संसार सोन्याचा केला, मला तिचं आनंदानच केलं पाहिजे" असं म्हणत लागेल ती सेवा म्हातारपणी करणारा नवराही विरळाच..... तुम्हांला मी इंग्रजी शिकवलं,पण माझी नात लिहिते तसं काही मला कधी जमणार नाही" असं शिष्याचं मोठेपण मानणारा गुरूही ऋषितुल्यच...आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये म्हणून तब्येतीची पथ्य कडक पाळणारा आजाही सहजी भेटणं कठीण...
उत्तम नाही पण बरं इंग्रजी, वाचनाची आवड, शास्त्रीय संगीतातली रुची....  sincerity , integrity, accountability,  सगळं सगळं त्याचं ... इदं न मम...
त्याच्याभोवती असणारे आम्ही दगड की लोखंड यावर वाद होऊ शकेल... पण तो निर्विवाद परीसच...
अशी दंतकथा आहे की माणूस वारल्यावर १ वर्षाने चित्रगुप्त म्हणे त्याचा हिशोब करतो आणि मग स्वर्ग, नर्क याचा चर्चेअंती निर्णय होतो... खरं खोटं माहीत नाही ..क्षणभर खरं मानलं, तर आम्हांला न सरणारी शिदोरी देऊन गेलेला पारसमणी छाती ठोकून सांगू शकेल....

देऊळ पलिकडे तरीही, मी ओंजळ फुटला खांब
बुबुळाच्या क्षितिजावरती मी उरलासुरला थेंब...
image credit : Google.com

No comments:

Post a Comment